लोकसभा निवडणुकीचा आता अवघा एक टप्पा शिल्लक आहे. परंतु राजकीय नेत्यांचे ‘अकलेचे तारे’ तोडणे सुरूच आहे. यात प्रधानसेवक आघाडीवर आहेत. याबाबत त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. परंतु कौतुकाची गोष्ट म्हणजे प्रधानसेवक त्याला अजिबात जुमानत नाहीत! पंतप्रधानपद हे अतिशय प्रतिष्ठेचे, आदराचे, मानाचे पद आहे. या पदाची प्रतिष्ठा, गरिमा राखली जात आहे का याचे उत्तर मनोजकुमारच्या ‘यादगार’ चित्रपटातील ‘एक तारा बोले…’ हे गीतच देऊ शकेल! हे एक विडंबन गीत आहे. या गीतातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनिष्ट प्रथा, चाली-रीतींवर ताशेरे ओढण्यात आले आहेत, खिल्ली उडवण्यात आली आहे.
सुमारे चार दशकांपूर्वीच्या या गीतातील प्रत्येक कडवे आजच्या घडीला तंतोतंत लागू पडते. राजकीय क्षेत्रावर भाष्य करणारे एक कडवे असे- ‘दो किसम के नेता होते है, एक देता है एक पाता है, एक देश को लूट के खाता है, एक देश पे जान लुटाता है, एक जिंदा रह कर मरता है, एक मर कर जीवन पाता है, एक मरा तो नामोनिशानही नही, एक यादगार बन जाता है’. आता या चौकटीत आजच्या नेत्यांना कसे बसवायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. असो. मुस्लिम समाजाच्या मतांसाठी इंडिया आघाडी त्यांचे गुलाम बनून ‘मुजरा’ करीत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या देहरी येथील जाहीर सभेत केला. या विधानाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. काँग्रेसने मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशाच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी असा शब्दप्रयोग केला नसता अशी भाषा मोदी करीत आहेत असे काँग्रेसने म्हटले. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचा शब्दप्रयोग करणे शोभा देत नाही, असे काँग्रेसचे माध्यम प्रमुख पवन खेरा म्हणाले. मोदींच्या मुखातून ‘मुजरा’ हा शब्द ऐकला. रणरणत्या उन्हात प्रचार केल्याने कदाचित त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला असावा असे खेरा म्हणाले,
‘लव्ह जिहाद’ची सुरुवात झारखंडमधून झाली असा आरोप करताना मोदी म्हणाले, झारखंडमधील जेएमएमच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडी घुसखोरांना आश्रय देत असून हे घुसखोर जमिनी बळकावून महिलांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करीत आहेत. जेएमएम जातीय राजकारण करीत आहे असा आरोपही त्यांनी केला. खरे तर आता कोणत्याच पक्षाने बाता मारण्याची गरज नाही. घोडा मैदान फार दूर नाही. ४ जूनला काय तो निकाल लागणारच आहे. तेव्हा मनाचे मांडे रचण्याची काय गरज? सत्ताधा-यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर लक्ष केंद्रित करायला हवे. लोकप्रतिनिधी व सत्ताधा-यांनी आजवर जनतेचे केलेले मनोरंजन खूप झाले. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम मतपेढीचा मुद्दा चर्चेला येतोच. मुस्लिम मतदार कोणाला मतदान करणार यावर सर्व राजकीय पक्षांचे लक्ष असते. मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी मतपेढी आपल्याकडे ओढण्याची खेळी राजकीय पक्षांनीच सुरू केली आहे. मुस्लिम नेहमीच एकगठ्ठा मतदान करतात. त्यामुळे सत्तापालट होऊ शकतो असे राजकीय पक्षांना वाटते. यामुळेच आपण मागे रहात आहोत काय याचा विचार या समाजाने करायला हवा. गत ७५ वर्षांत आपला समाज अपेक्षित प्रगती का करू शकला नाही याचाही विचार करावयास हवा.
मुघल, मुस्लिम, काँग्रेस महिलांचे मंगळसूत्र काढून घेईल, उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना, शरद पवारांची नकली राष्ट्रवादी, काँग्रेसवाले मतांसाठी मुजरा करतील अशी एकाहून एक भारी विशेषणे पंतप्रधान मोदींनी विरोधकांविरुद्ध वापरली. या वक्तव्याचा परिणाम सामान्य मतदारांवर निश्चितपणे झाला आहे. त्यांना ते आवडले नाही हेही निश्चित. या घसरलेल्या जिभेमुळे आणि बेताल वक्तव्यामुळे मोदींची प्रतिमाही मलिन झाली आहे. जीभ घसरण्याचा आजार हा नवीन नाही. गत दहा वर्षांचा आढावा घेतला तर हा विकार जुनाच असल्याचे दिसून येईल. प्रतिवाद करण्यासाठीचे सगळे मुद्दे संपले की राजकीय नेते गुद्यावर येतात किंवा शिवराळ भाषेचा वापर करतात. स्वत:ची अथवा आपल्या पक्षाची बाजू मांडण्याचे ठोस मुद्दे सरले की नेते हतबल होतात. ही हतबलता विरोधकांना जाणवू नये म्हणून आक्रमक झालेल्या नेत्यांची जीभ घसरते. पंतप्रधानांचे नेमके तेच झाले. विरोधकांची खिल्ली उडवण्याच्या नादात त्यांनी देशभरातील जनतेची नाराजी ओढवून घेतली. राजकीय विरोध हा सौम्य शब्दांत प्रभावीपणे मांडता येतो हे आजवरच्या अनेक दिग्गज नेत्यांनी दाखवून दिले आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते डॉ. मनमोहन सिंग यांची भाषणे पाहिली तर त्यांनी प्रसंगी विरोधकांवर कठोर टीका केली पण कधीही त्यांनी आपली भाषा घसरू दिली नाही. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने अर्वाच्च भाषेत बोलणे त्या पदाला शोभत नाही.
पंतप्रधानांनी आपल्या वक्तृत्वातून अन्य नेत्यांना वस्तुपाठ घालून देणे अपेक्षित असते. पंतप्रधानच बेताल वक्तव्य करू लागले तर अन्य नेतेही त्यांचाच कित्ता गिरवणार. ताळतंत्र गमावलेले नेते जेव्हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात तेव्हा त्यांच्या समर्थकांचे कदाचित मनोरंजन होत असेलही, पण त्यामुळे आपण एकूणच राजकारणाचा स्तर बिघडवत आहोत, अनिष्ट पायंडा पाडत आहोत याचे भान त्यांनी ठेवायला हवे. जेव्हा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा त्यांच्या वक्तृत्वातील गांभीर्य नाहीसे होते आणि तो टिंगलटवाळीचा विषय होतो. म्हणून राजकीय नेत्यांनी सार्वजनिक जीवनात तारतम्य बाळगूनच वक्तव्य केले पाहिजे. अर्थात त्यासाठी वाचन आणि व्यासंग हवा. भाषाच नेत्यांचा दर्जा स्पष्ट करते. राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिरल्याने शिवराळ भाषेचे स्तोम माजले असावे शिवाय अशिक्षितांचा भरणा झाल्याने वक्तृत्वाचे महत्त्व समजत नसावे. संघाच्या मुशीत तयार झालेल्या शिस्तबद्ध पंतप्रधानांकडून बेताल वक्तव्य अपेक्षित नाही.