पुणे : प्रतिनिधी
सगळ्या योजनांचे पैसे मतांची बेगमी करण्यासाठी वळतात का? बहीण विचारते ओवाळणी दिली, पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचे काय? बहीण विचारते भाच्याच्या नोकरी, लग्नाचे काय? ‘मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी’अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. दरम्यान, अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवरूनही खोचक टोला लगावला.
संस्था असणा-यांनी शरद पवारांचे बोट सोडले, भले भले म्हणणारे सोडून गेले. अमोल कोल्हे म्हणाले की, आमच्या मतदारसंघांमध्ये गुलाबी यात्रा निघाली. मात्र, या गुलाबी यात्रेला भाजपचे नेते काळे झेंडे दाखवत आहेत. लाडकी बहीण कोणाची हेच कळेनासे झाले आहे. मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्र्यांची हेच कळेनासे झाले असेही अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे यांनी सांगितले की पक्षावर गेल्यावर्षी अनेक अडचणी आल्या. विशेष म्हणजे संस्था असणा-यांनी शरद पवारांचे बोट सोडले, भले भले म्हणणारे सोडून गेले. संस्था असतील तर अडचणी येतात असे अनेक जण सांगत होते, पण राजेश टोपे साहेबांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही. ‘लोकसभा झांकी है विधानसभा बाकी है’ असेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.