मुंबई : ईदनिमित्त ३२ लाख मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’ किटचे वाटप करण्याच्या मोदी सरकारने केलेल्या घोषणेवरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या किटमध्ये शेवया, चंद्र खजूर, सलवार-कमीज आणि कुर्ता-पायजमा यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.
ही ‘सणाची भेट’ म्हणून सादर केली जात आहे, मात्र वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले की, ‘लहू में भीगी हुई सौगात-ए-मोदी! सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली.’ ते पुढे म्हणाले की, ज्यांचे हात मुस्लिमांच्या रक्ताने माखले आहेत तेच आता त्यांना मिठाई आणि कपडे देऊन शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
देशातून २२ टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहत आहेत
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप, आरएएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. १९९९ पासून सत्तेत आल्यापासून अँटी मुस्लिम भूमिकेचा स्टँड राहिलेला आहे. गोध्रा घडवण्यात आलं आहे. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिंग केलं जातं आणि त्याचे व्हीडीओ आपल्याला मिळतात. मुस्लिमांना साईड ट्रॅक करायचं हा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. मात्र, सौगात-ए-मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते. अशात हे राजकीयदृष्टीने केलेला हा कार्यक्रम आहे. देशातून २२ टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहत आहेत, अशात मतदार जात असल्याने हे कृत्य करत आहेत. मतांसाठी मुस्लिमांचे लांगुलचालन चाललेलं आहे. ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे
बिल्किस बानोवर झालेला अत्याचार विसरणेही अवघड
त्यांनी आठवण करून दिली की तबरेज अन्सारी, मोहम्मद अखलाक, पेहलू खान, जुनेद खान, रकबर खान यांसारखे अनेक मुस्लिम मॉब लिंचिंगचे बळी ठरले आहेत आणि आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. २००२ च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानोवर झालेला अत्याचार विसरणेही अवघड आहे. आंबेडकरांनी विचारले की, ‘मुस्लिम इतक्या लवकर विसरतील का ज्यांनी त्यांच्याविरुद्ध द्वेष पसरवला, त्यांच्या धार्मिक चिन्हांचा अपमान केला आणि आता तेच लोक त्यांना निवडणुकीपूर्वी ईद भेट देत आहेत?’