; लातूर : प्रतिनिधी
कर संकलन व कर आकारणी विभाग लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासूनच १०० टक्के मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवून मालमत्ताधारकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार चालू वर्षातील मालमत्ताधारकांसाठी सूट व थकबाकीधारकांसाठी शास्ती माफी योजना वेळोवेळी लागू करण्यात आली होती. त्या अंतर्गत विविध प्रकारचे सुट व १०० टक्के शास्ती माफी योजना ही लागू करण्यात आली होती. सदरील सुटचा लाभ घेऊन आतापर्यंत २० हजार हून अधिक मालमत्ताधारकांनी आपला टॅक्स भरणा केला आहे, परंतु वारंवार प्रशासनामार्फत आवाहन करून ही व सूट लागू करून ही काही मालमत्ताधारक प्रतिसाद देत नसल्याने पुढील महिन्यापासून जप्तीची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी थकबाकीदार मालमत्ताधारकांना शेवटची संधी देण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा १०० टक्के शास्ती माफी ची योजना लागू करुन थकबाकीधारकांना टॅक्स भरणा करण्याची संधी देण्याच्या निर्णय आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांनी घेतला आहे.
तेंव्हा सर्व मालमत्ताधारकांनी गणेशोत्सव निमित्त लागू केलेल्या ऑफर अंतर्गत दिं. २४ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर या कालावधीत आपल्याकडील थकीत कर एक रक्कमी भरल्यास आकारण्यात आलेल्या व्याज/शास्ती मध्ये १०० टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच १००% शास्ती सुट योजना या वर्षात तिस-यांदा लागू करण्यात आली असून ही शेवटची संधी असून यानंतर पुन्हा ही योजना लागू होणार नसल्याचे निर्णय घेण्यात आला आहे तरी अधिकाधिक थकबाकीदारानी सुवर्णसंधीचा लाभ घेऊन टॅक्स भरणा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तरी या योजनेचा सर्व थकबाकीधारक मालमत्ताधारकांनी लाभ घेवुन आपल्याकडील देय कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे व पुढील महिन्यापासून सुरू होणारे जप्ती सारखी कटू कार्यवाही टाळावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांनी केले आहे.