लातूर : प्रतिनिधी
उपसचिव, महसूल व वनविभाग, महाराष्ट्र शासन यांचे दि. १७ मार्च २०२५ यांच्या पत्रास अनुसरुन जिल्हाधिकारी, लातूर यांनी दि. ११ ऑगस्ट २०२३ पासून शासनाने उशिरा नोंदीबाबतच्या आदेशांविषयी दिलेल्या स्थगिती आदेशापर्यंत निर्गमीत केलेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांपैकी जे प्रमाणपत्र तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकारी यांनी निर्गमीत केलेली आहेत ते प्रमाणपत्र रद्द करणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लातूर शहर महानगरपालिकेने जन्माचे २२५७ तर मृत्यूचे २०१ प्रमाणपत्र रद्द केले आहेत.
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, लातूर यांनी त्यांच्या कार्यालयातील नायब तहसीलदार यांनी उशिरा नोंद घेणेबाबतचे निर्गमीत केलेले उशिरा जन्म-नोंदणीबाबतचे एकूण २२५७ व उशिरा मृत्यू नोंदणीबाबतचे एकूण २०१ नोंदणी आदेश रद्द केले आहेत व त्यांची यादी कळवून या आदेशांच्या आधारे निर्गमीत केलेले जन्मप्रमाणपत्रे व मृत्यूप्रमाणपत्रे रद्द करणेबाबत आवश्यक कार्यवाही करुन त्याचा अनुपालन अहवाल सादर करणेबाबत लातूर शहर महानगरपालिकेस सुचना दिल्या आहेत.
तरी ११ ऑगस्ट २०२३ नंतर नायब तहसीलदार लातूर यांच्या स्वाक्षरीने ज्यांना उशिरा नोंद घेणेबाबतचे आदेश प्राप्त झाले होते व त्याआधारे लातूर शहर महानगरपालिकेमार्फत ज्या नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आलेले आहेत. असे सर्व जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे शासनाकडून प्राप्त सुचनेनूसार रद्द करण्यात आले आहेत. याची नोंद घ्यावी. अश्या सर्व संबंधित नागरिकांनी उशिरा नोंद घेणे बाबतचे प्रस्ताव तहसील कार्यालय लातूर येथे परत सादर करावेत व त्याआधारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.