30.3 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंचा मेहुणा तडीपार; राज्य सरकारची मोठी कारवाई

मनोज जरांगेंचा मेहुणा तडीपार; राज्य सरकारची मोठी कारवाई

जालना : प्रतिनिधी
मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावर जालना प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, समाजासाठी झटणारे जरांगे पाटील आणि दुसरीकडे वाळूचोरीच्या प्रकरणात त्यांचा मेहुणा अडकल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटीलही चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कमी लेखण्याची चूक करू नये, असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे. हे सर्व सुरू असतानाच राज्य सरकारनेही आता जालन्यात मोठी कारवाई सुरू केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह ९ वाळूमाफियांना तडीपार करण्यात आले आहे. रात्री उशिरा अंबड उपविभागीय न्यायदंडाधिका-यांनी हा आदेश दिला. तडीपार झालेल्या व्यक्तींवर अवैध वाळू उत्खनन, चोरी, जाळपोळ, जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, तसेच सरकारी कामात अडथळा आणण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे प्रशासनाने वाळूमाफियांना मोठा दणका दिला आहे.

विशेष म्हणजे, तडीपार करण्यात आलेल्या ९ आरोपींपैकी ६ जण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. १ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर, बस जाळल्याच्या प्रकरणात विलास खेडकर यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

वाळूमाफियांवर कठोर कारवाई
जालना प्रशासनाने वाळूमाफिया आणि गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. जालना जिल्ह्यासह बीड, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यांतून ९ आरोपींना तडीपार करण्यात आले आहे. अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपींवर गुन्हे दाखल असल्याने प्रशासनाने कठोर निर्णय घेतला. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे.

जालना जिल्ह्यात वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, एकूण ९ जणांना तडीपार करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या कठोर निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गजानन गणपत सोळुंके, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, विलास हरिभाऊ खेडकर, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर व वामन मसुरराव तौर यांना तडीपार करण्यात आले आहे

विलास खेडकर यांच्यावर कठोर कारवाई
विलास खेडकर यांना जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल असून, त्यात प्रामुख्याने वाळूचोरी आणि सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानीशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे.

तडीपारीचा निर्णय
या सर्व गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, उपविभागीय न्यायदंडाधिका-यांच्या आदेशानुसार, विलास खेडकर यांना जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली असून, प्रशासनाने वाळूमाफियांवर वचक बसवण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR