छत्रपती संभाजीनगर : राज्यात भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना मराठवाड्यात पाणीटंचाईचे चित्र अधिक गडद होत चालले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २७८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असून या २७८ गावांची आणि ९९ वाड्यांची तहान ४३३ टँकरनी भागवली जात आहे. हे चित्र आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उन्हाच्या वाढत्या झळांमध्ये पाणीटंचाईची समस्या देखील तितकीच गडद होत चालली आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हे चित्र अधिक आहे. यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेली २७८ गावे आणि ९९ वाड्यांना मिळून ४३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७७ गावे आणि ३१ वाड्यांसाठी २५७ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत असून ७० गावे आणि १९ वाड्यांना १२० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नांदेड जिल्ह्यातील ६ गावे व २१ वाड्यांना १८ टँकरनी, तर बीड जिल्ह्यात १८ गावे आणि २३ वाड्यांना २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. परभणी जिल्ह्यातील एका गावाला, तर हिंगोली जिल्ह्यातील २ वाड्यांना १ टँकर, लातूर जिल्ह्यातील २ गावे आणि ३ वाड्यांना मिळून ३ टँकर, तर धाराशिव जिल्ह्यातील ४ गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
७५५ विहिरींचे अधिग्रहण
प्रशासनाने ७५५ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले असून यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८५, जालना १४७, परभणी १९, हिंगोली ६५, नांदेड १६८, बीड ६५, लातूर ४४ आणि धाराशिव जिल्ह्यात ५९ विहिरींचा समावेश आहे. टँकरसाठी २०२ गावांतील २३९ विहिरींचे, तर टँकरव्यतिरिक्त ४२२ गावांतील ५१६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.