39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाडा, विदर्भात वादळी पाऊस

मराठवाडा, विदर्भात वादळी पाऊस

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात आठवड्यापूर्वी नाशिक, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसाने पिकांना फटका बसल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा ४० च्या पुढे गेला आहे.

वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता हे कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. मात्र उत्तर विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा असल्याने विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर या भागात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत उष्णतेचा पारा वाढला असून ३५ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

‘या’ भागात वादळी वा-यासह पावसाचा इशारा
कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, परभणी, बीड, सातारा, अमरावती, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर या भागात वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट होऊन पावसाचा अंदाज आहे. या भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नांदेड, लातूर, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग या भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी
बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. संस्कार सोनटक्के या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. संस्कार सोनटक्के हा बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये शिकत होता. तो इयत्ता सहावीत होता. संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. यानंतर त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR