15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाड्याची ‘पाणीचिंता’ मिटली

मराठवाड्याची ‘पाणीचिंता’ मिटली

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात घोंघावणा-या चक्रीवादळाने पावसाचा जोर वाढतोय. दरम्यान, मराठवाड्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण आता ८४.१२ टक्के भरले आहे. मराठवाडा विभागातील धरणांमधील पाणीसाठा आता हळूहळू वाढू लागला आहे.
दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली होती. धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने दिलासादायक चित्र आहे.

मराठवाडा विभागातील हजारो गावांची तहान भागवणारे आणि सर्वाधिक क्षमता असणारे जायकवाडी धरण ८४.१२ टक्क्यांनी भरल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. जायकवाडी धरण क्षेत्रात एक जूनपासून आतापर्यंत ४६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी एक जून २०२३ दरम्यान झालेला पाऊस १५५ मिमी एवढाच होता.

बीड जिल्ह्यातील मांजरा धरण ४० टक्क्यांवर
बीड जिल्ह्यातील धरणं मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काही प्रमाणात अधिक भरली असल्याचे दिसून येत आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवार, दिनांक १ सप्टेंबर रोजी मांजरा धरण ४०.५७ टक्के भरले आहे. माजलगाव धरणात अजूनही पाणीसाठा शून्यावरच आहे. इतर धरणांमध्ये हळूहळू वाढ होत आहे.

हिंगोलीतील धरणांची काय परिस्थिती
हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण आज ७८.२९ टक्क्यांनी भरले आहे. मागील वर्षी सिद्धेश्वर धरणामध्ये ४५.९३ टक्के पाणीसाठा होता. तर सर्वाधिक जलक्षमतेच्या येलदरी धरणात ४१.८७ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा ५९.९२ टक्के एवढा होता. अजूनही येलदरीत मागील वर्षाच्या तुलनेत जलतूट नोंदवण्यात आली आहे.

नांदेडचे निम्नमनार १०० टक्के, विष्णुपुरी ८५ टक्क्यांवर
नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक जलक्षमतेचे निम्नमनार धरण १०० टक्के भरले. मागील वर्षी ५२ टक्क्यांवर असणारे हे धरण पूर्ण भरल्यामुळे नांदेडकरांना दिलासा मिळाला. विष्णुपुरी धरणात ८५.५८ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला.

धाराशिवमध्ये दिलासादायक चित्र
धाराशिवमधील धरणांची परिस्थिती असून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून या जिल्ह्याची तहान भागत असल्याने जिल्ह्यात दिलासादायक चित्र आहे. उजनी धरण १०० टक्के भरले असून धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा ३५.७ टक्के तर सीना-कोळेगाव अजूनही शून्यावर आहे.

लातूर, परभणीची परिस्थिती काय?
यंदा लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणे ६० ते ८० च्या घरात गेली आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेचे शिवनी धरण ७९.२२ टक्क्यांनी भरले असून मागील वर्षी धरणात केवळ ०.६८ टक्के पाणीसाठा होता. खुलगापूर धरणात ८२.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात २४.१० टक्के पाणीसाठा झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR