निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील सावनगीरा येथील २४ वर्षीय तरुणाने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी पोलिसांना सापडली त्यामुळेच आरक्षणाचा आणखी एक बळी म्हणून सर्वत्र हळ-हळ व्यक्त होत आहे. सावनगीरा येथील किरण युवराज सोळुंके वय २४ वर्षे शिक्षण बीकॉम पदवीधर या युवकांनी आपल्या शेतात सकाळी उसाला पाणी बघून येतो म्हणून उसाच्या फडाकडे गेला व तेथेच शेजारी असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
यावेळी निलंगा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून किरण याच्या खिशातील सापडलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे असा मजकूर लिहून खाली स्वाक्षरी केल्याचे निदर्शनात आले. किरण व त्याचे कुटुंबीय शेतातच घर करून राहतात. सकाळी जनावराच्या धारा काढून घरी दूध ठेवून मी ऊसाला पाणी पाहून येतो असे सांगून गेला तो आलाच नाही म्हणून घरच्या लोकांनी शोधाशोध केली असता उसाच्या शेजारीच किरणचा मृतदेह झाडाला लटकत असलेला दिसून आला. निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. मयत किरणच्या पश्चात आई, वडील ,भाऊ, दोन बहिणी, भाऊजी, भाचे असा परिवार आहे. निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात सावनगीरा या गावचे ग्रामस्थ व कुटुंबीयांनी जमा होऊन जोपर्यंत मृताच्या कुटुंबीयास शासनाकडून आर्थिक मदत मिळत नाही व कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी असे प्रशासनाकडून लेखी दिल्याशिवाय मयत किरण याचे अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतला. निलंगा पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला.