लातूर : प्रतिनिधी
मी मराठा समाजातील लेकरांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणुन लढत आहे. परंतू, सरकारने मला संपविण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यात सरकारला यश मिळाले नाही. त्यामुळे आता एक नवे षडयंत्र सुरु करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांना उतरविण्यात आले असून मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद असल्याचा आरोप मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथे मंगळवारी मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना केला.
सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलानादरम्यान राज्यात मराठा बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागण्या मार्गी लावण्यासाठी १३ जुलैची दिलेली डेडलाईन सरकारने पाळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दि. ९ जुलै रोजी भव्य मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. येथील छत्रपती राजर्षी शाहू महराज चौकातून दुपारी २.२० वाजता शांतता रॅलीस प्रारंभ झाला. तत्पुर्वी मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शांतता रॅली छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातून निघाली. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, महात्मा गांधी चौक, अशोक हॉटेल चौक मार्गे रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहंचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी लाखोंच्या संख्येने जमलेल्या मराठा समाज बांधवांशी संवाद साधला.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, सगेसोय-यांबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, आम्ही कधीच तुम्हाला विरोधक मानले नाही. परंतू, जर मंत्री छगन भुजबळ यांचे ऐकुन मराठा समाजावर अन्याय करणार असाल तर विधानसभेच्या निवडणुकीत पाहूण घेऊ. छगन भुजबळ यांचे स्वप्न कधीच साकार होऊ देणार नाही, असे नमुद करुन मनोज जरांगे पाटील पुढे म्हणले, आमच्या कुणबी नोंदी असून आम्हाला आरक्षण नाही आणि ओबीसीच्या नोंदी नसताना त्यांना आरक्षण कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो कुणबीची एकही नोंद रद्द झाली तर खुप मोठे आंदोलन होईल. राज्यातील सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी मराठयांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सहकार्य करावे, पक्षाची बाजू घेऊ नका, जात मारु नका, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. आम्ही जातीवाद करीत नाही, आम्ही आमच्या लेकरांच्या न्यायासाठी लढतो.आता जर मुंबईला जायचे ठरले तर आरक्षण घेतल्याशिवाय यायचे नाही, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
विधानसभेच्या निवडणुकीत जे करायचे ते ताकदीने करा
माझ्या उपोषणाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन या सर्वानी मराठा सगेसोय-यांना आरक्षण देण्याचे मान्य केले होते. आता फाटेफोडत आहेत. तुम्ही मराठ्यांची मते घेतली, आज तुम्ही सत्तेत आहात म्हणून सांगतो आहे. फाटे न फोडत सगेसोयरेची अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलनाच्या तिस-या टप्प्यानंतर विधानसभेच्या आगामी निवडणुकीबाबत ठरवले जाईल. परंतू, आरक्षणाच्या बाजूने जो असेल त्याना सहकार्य राहील. बाकी कोणालाही निवडुन आणा, कोणालाही पाडा पण जे कारायचे ते पुर्ण ताकदीने करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.