18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रमविआ चे सरकार पाडण्यात अदानींचा हात?

मविआ चे सरकार पाडण्यात अदानींचा हात?

मुंबई :  आता राज्याच्या राजकारणात मोठे उद्योजक गौतम अदानी यांची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. संजय राऊत यांनी महायुतीवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात गौतम अदानी यांचा हात होता, हे स्पष्ट होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

कुणाच्या अंगात आले होते, हे अजितदादांनी एकदा तपासावे. अडीच वर्षे आम्ही चांगल्या प्रकारे सत्ता राबवली. पण गौतम अदानी यांना महाविकास आघाडीचे सरकार नको होते. ही मुंबई, महाराष्ट्र अदानी यांना गिळायचा आहे. विकत घ्यायचा आहे. ओरबाडायचा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी अगोदर शिवसेना तोडली. त्यासाठी अदानींचा वापर केला हे या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा सांगत आहेत.

शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी तोडण्यामागे गौतम अदानी हे होते. महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे अदानी होते, हे अजित पवार कबूल करत आहेत. यापेक्षा कोणताही मोठा पुरावा असू शकतो का? असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

ही मुंबई उद्योजकांना विकण्याचा डाव मोदी, शहा, फडणवीस यांनी केला आणि खेळला. तो यशस्वी झाला. त्यामुळे आमची या निवडणुकीतील लढाई ही गौतम अदानी आणि त्यांच्या व्यापारी वृत्तीविरोधात आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अदानी हे एकच आहेत. या राज्यातील सूत्रे अदानी यांना त्यांच्या हातात हवी आहेत. त्यामुळेच त्यावेळी अदानी यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.

पैसे पोहोचवले
उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आहे. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी अधिका-यांची हिंमत असेल तर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची बॅग तपासणी करून दाखवावी असे ते म्हणाले. तर जिथे पैसे पोहोचवायचे तिथे शिंदे, फडणवीस, अजितदादांनी पोहोचवले असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR