सांगली : सांगली शहरातील प्रमुख मार्ग, अंतर्गत रस्त्यांवर भटक्या जनावरांची संख्या मोठी आहे. या जनावरांमुळे अपघात होत असतात मात्र, यांचा बंदोबस्त केला जात नाही. सांगली शहर आणि परिसरात अनेक रस्त्यावर मोकाट गाढव फिरत असतात. मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असते. मात्र, अपघात झाल्यानंतर एक व्हीडीओ व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या विरोधात कॉमेंट सुरु झाल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली. या व्हीडीओमुळे सांगली मनपाचे प्रशासन जागे झाले आहे. महानगरपालिकेने गाढवांविरोधात कारवाई सुरु केली आहे.
नेटकऱ्यांनी सांगली महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मनपा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवून नऊ गाढवे पकडण्यात आली. मात्र, एका दिवसासाठी ही मोहीम राबवून चलणार नाही. मनपाने सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. कारण सांगली महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असतात. त्यात शहरातील गावभाग परिसरात तर मोकाट गाढवांची संख्या मोठी आहे. यासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर कारवाई झाली नव्हती.