नागपूर : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देण्यात आले. मात्र, आता सरकार स्थापन झाल्यावर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी केली जात आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी म्हण आहे, त्याप्रमाणे महायुती सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याची टीका विधिमंडळातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना मते विकत घेण्यासाठी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले, आता सरकार आल्यावर मात्र विविध अटी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या ही २५ टक्क्यांपर्यंत आणणार, असे महापाप सरकार करत आहे. या सरकारला या बहिणीच जागा दाखवू शकतात अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी जे निर्णय घेतले त्याची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. हे महायुतीमधील मतभेद आहेत. महायुती सरकारचा कारभार स्वच्छ असणार असा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला. त्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या निर्णयापासून झाली आहे. महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. जनतेला मात्र वा-यावर सोडले अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित
या सरकारमध्ये भांडणेच जास्त आहेत. शेतक-यांना, महिलांना नुसती आश्वासने दिली. ही कामे कधी होणार याची शाश्वती नाही पण एकमेकांशी भांडून जनतेच्या प्रश्नावरून लक्ष मात्र विचलित केले जात आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, दमानिया या पुराव्यानिशी बोलत आहेत. त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असे वडेट्टीवार म्हणाले.