मुंबई : प्रतिनिधी
रायगडचे पालकमंत्रिपद हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कळीचा मुद्दा ठरला आहे. शिवसेनेचे नेते रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांनी या पदावर दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस या पदावरील आपला दावा सोडण्यास तयार नाही. यातूनच सत्ताधा-यांमध्ये धुसफूस सुरूच आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळातील सहका-यांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. मात्र, एका नेत्याचा अपवाद वगळता शिंदे गटातील मंत्री आणि आमदार या विशेष शोसाठी गेले नाहीत. त्यामुळे शिंदे गटाने यावर बहिष्कार टाकल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आधी मुख्यमंत्रिपदावरून अडून राहिलेली शिवसेना आता रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे. रायगडचे पालकमंत्रिपद हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कळीचा मुद्दा ठरला आहे. शिवसेनेचे नेते रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांनी या पदावर दावा केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस या पदावरील आपला दावा सोडण्यास तयार नाही. त्यांच्या वाट्याला हे पद आल्यास ओघाने ते आदिती तटकरे यांच्याकडेच जाईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील या वादामुळेच या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांकडे केवळ जिल्ह्याचे प्रशासकीय नियंत्रणच नाही तर ते जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीचे अध्यक्षपदही भूषवतात. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या योजना आणि विकास कामांसाठी निधी वाटप केले जाते.
या दोन पक्षांमधील वाद इतका विकोपाला गेला आहे की, आता थेट इशारे देण्यास सुरुवात झाली आहे. राजकारण करायला गेलात, तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. पण, पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर, ‘छावा’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसला असल्याचे सांगत, महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पवार उपस्थित
याआधी अजित पवार यांनी बोलावलेल्या जिल्हा नियोजन बैठकीला शिवसेनेच्या आमदारांनी पाठ दाखवली होती. तर आता, ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्य प्रमुख नेते आले होते. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून फक्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.