मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अविश्वासाचे वातावरण मिटवण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी सोमवारी उशिरा रात्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाला पूर्ण पाठिंबा असेल असे जाहीर केले होते. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात त्यांनी गृहमंत्रिपदाची मागणी केली होती. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आणि भरत गोगावले या दोन्ही नेत्यांनी अशी मागणी करण्यात आली असेल तर त्यात काही गैर नाही असे म्हटले होते. उपमुख्यमंत्रिपद ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे गृहखाते देखील दिले जाते, असे दाखलेही त्यांनी दिले. मात्र भाजप शिवसेनेला गृहखाते देण्यास उत्सुक नसल्याचे दिसत आहे.
महायुतीत ‘गृह’कलह निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शिवसेनेच्या खातेवाटपावर मंगळवारपासून चर्चेचा मार्ग यामुळे खुला झाल्याचे बोलले जात आहे. मात्र महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.
शपथविधी दोन दिवसांवर आला आहे. मात्र महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. हा पेच दूर करण्यासाठीच महाजन हे शिंदेंच्या भेटीसाठी गेले होते. एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेले होते. तिथून आल्यानंतर आजारपणामुळे ठाण्यातील निवासस्थानीच ते थांबून होते. महायुतीतील ‘गृह’कलह मिटवण्यासाठी अखेर भाजपचे दूत गिरीश महाजन शिंदेंकडे पोहोचले. त्यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे मानले जात आहे.
४ डिसेंबरला भाजप गटनेता निवडणार
भाजप गटनेता निवडीची प्रक्रिया उद्या (४ डिसेंबर) होणार आहे. केंद्रीय निरीक्षक म्हणून निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्रात येण्यापूर्वी शिवसेना आणि भाजप यांच्यात खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. महाजन यांच्या भेटीनंतर जागावाटपावरील चर्चेचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.