21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा पंतप्रधानांचा घाट

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा पंतप्रधानांचा घाट

दिंडोरी : प्रतिनिधी
पंतप्रधान देशाचे असतात मात्र, मोदी केवळ एकाच राज्याच्या विकासात मग्न आहेत. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा त्यांचा घाट आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास नदीजोड प्रकल्प राबवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच देऊ असे आश्वासन खासदार शरद पवार यांनी दिले. दिंडोरी येथे महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

खा. पवार म्हणाले की, केंद्र सरकारने १६ उद्योगपतींचे १४ हजार कोटी रुपये माफ केले. मात्र, शेतक-यांचे कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्या करीत आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर शेतक-यांना सरसकट तीन लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात येईल, तर नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर दिले जातील. जातनिहाय जनगणना करण्याचा आमचा मानस असून, राज्यात महिला सुरक्षित नाहीत.

गेल्या सहा महिन्यांत ९६० महिला बेपत्ता झाल्या आहेत. राज्य सरकार या महिलांचा शोध घेण्यास असमर्थ ठरले आहे. शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. पर्यायाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले, अशा शेतकरीविरोधी भूमिका घेणा-या सरकाला धडा शिकविण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शेवटी पवार यांनी केले.

संविधान बदलू देणार नाही
लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा देत संविधान बदलण्याची भाषा करणा-यांना जनतेने ३०० च्या आतच थांबवले. भाजपच्या एका खासदाराने तर आम्हाला संविधान बदलण्यासाठी ४०० पार जागा हव्या असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याची ताकद कोणातही नाही, आम्ही त्याचे संरक्षण करू, अशी ग्वाही यावेळी खा. पवार यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR