दौंड : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर एक महिन्याच्या आत केंद्रातील भाजपचे सरकार घरी जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पाटस (ता. दौंड) येथे शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
दरम्यान, शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणा-यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दिसून आली, अशी अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, यात शंका नाही. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एक महिन्यात अन्य पक्षांचा पाठिंबा घेतलेले केंद्रातील भाजप सरकार घरी गेलेले असेल. आमची लढाई भारतीय जनता पार्टीबरोबर आहे. ही लढाई मराठी माणसांच्या जोरावर जिंकल्याशिवाय राहणार नाही.
नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांना खुर्ची टिकवण्यासाठी शेतक-यांची माफी मागावी लागते, यासारखे दुर्दैव नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाकडे चार खासदार राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर आठ खासदार झाले. ही शरद पवारांच्या पाठीशी असलेली मराठी माणसांची ताकद आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर सर्व छोट्या-मोठ्या संस्था आमच्याकडे नव्हत्या. मात्र, आमच्याकडे मतदार राजा होता. दरम्यान, मतदारांनी त्यांची श्रद्धा आमच्यावर दाखविल्याने आमच्या खासदारांची संख्या वाढली.