पुणे : प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमधील सहाजण महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याबरोबरच पनवेल आणि डोंबिवलीतील पर्यटकांनी या हल्ल्यात प्राण गमावले आहेत. डोंबिवलीमधील तिघांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. तर पुण्यातील दोघांनी या हल्ल्यात प्राण गमावले असून पनवेलमधील एका पर्यटकाचा गोळीबारामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
डोंबिवली पश्चिम भाग शाळा मैदान येथे सावित्री अपार्टमेंटमध्ये राहणारे हेमंत जोशी हे पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मरण पावले आहेत. ठाकूरवाडी येथील राहणारे अतुल मोने (५२) आणि सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले (४४) यांचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील इतर भागामधून पहलगामला पर्यटनासाठी गेलेल्या तिघांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
डोंबिवलीत राहणारे जोशी, लेले आणि मोने या कुटुंबातील प्रमुख दोन दिवसांपूर्वी पत्नी-मुलांसोबत काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. मात्र दहशतवादी हल्यात हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. डोंबिवली पश्चिममध्ये राहणा-या या तिघांचाही मृत्यू झाला आहे. डोंबिवलीमधून तिन्ही कुटुंबांचे नातेवाईक काश्मीरला रवाना झाले आहेत. याचबरोबर पुण्याचे रहिवासी असलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोन पर्यटकांचाही पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पनवेलमधील खंदा कॉलनीतील रहिवासी दिलीप डिसले यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
पनवेलमधील निसर्ग ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून येथील एकूण ३९ पर्यटक जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. त्यातील दिलीप देसलेंचा मृत्यू झाला आहे. तर याच ग्रुपमधील सुबोध पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांना श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करून आणण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत. पनवेलमधील ग्रुपमधले इतर सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांना राज्यात परत आणण्याच्या व्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या संभाषणादरम्यान शिंदे यांनी नायडू यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याची विनंती केली. विनंती स्वीकारून नायडू यांनी आश्वासन दिले की अडकलेल्या पर्यटकांची यादी उपलब्ध झाल्यानंतर त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्याची व्यवस्था केली जाईल. उपमुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.