नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना कर परतावा जारी केला आहे. भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना या निधीचं वाटप केलं आहे. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रानं राज्यांना एकूण ब लाख ७३ हजार ०३० कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केलं. महाराष्ट्राला १०९३०.३१ कोटी रुपयांचा निधी मिळाला.
केंद्र सरकारने राज्य सरकारांना त्यांच्याकडे जमा झालेल्या कराच्या रकमेतून १ लाख ७३ हजार ०३० कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले. डिसेंबर २०२४ मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण ८९,०८६ कोटी रुपये इतके होते. त्या तुलनेत जानेवारी महिन्यातील रकमेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
केंद्राने राज्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात असल्याची माहिती दिली.
सर्वाधिक निधी उत्तरप्रदेशला
केंद्र सरकारनं जारी केलेल्या निधीपैकी सर्वाधिक निधी उत्तर प्रदेशला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशला ३१०३९.८४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्या पाठोपाठ बिहारचा नंबर येतो. बिहारला १७४०३.३६ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मध्य प्रदेशला १३५८२.५६ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यानंतर महाराष्ट्राला १०९३०.३१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानला देखील चांगला निधी मिळाला आहे. राज्यस्थानला १०४२६.७८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.