हैदराबाद : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशमधील महिला कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला दिनापूर्वीच राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी महिलांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ची घोषणा केली आहे. या निर्णयाची राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. या घोषणेबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर केली आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की, या निर्णयामुळे कामाच्या ठिकाणी महिलांची उत्पादकता आणखी सुधारेल. कोविड १९ साथीच्या काळात काम करण्याच्या पद्धतींमध्ये मोठा बदल झाला आहे. तंत्रज्ञानामुळे घरून काम करणे सोपे झाले. रिमोट वर्क, कोवर्किंग स्पेस आणि नेबरहुड वर्कस्पेस यासारख्या व्यवस्था व्यवसाय आणि काम करणा-या लोकांसाठी फायदेशीर ठरल्या आहेत, यामुळे कामाची उत्पादकता देखील वाढेल, असेही मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू म्हणाले.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पोस्टमध्ये लिहिले की, अशा उपक्रमांमुळे आपल्याला काम आणि जीवनातील संतुलन चांगले राहण्यास मदत होऊ शकते. आंध्र प्रदेशात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याची आमची योजना आहे. आंध्र प्रदेश आयटी आणि जीसीसी धोरण ४.० हे त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात काम करणा-या महिला आणि मुलींना आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, आमचे सरकार या क्षेत्रात महिलांसाठी समान संधी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. या योजनेद्वारे, सरकार महिलांसाठी काम आणि जीवनातील संतुलन सुधारण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रत्येक संधी आणि मदत देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.