लातूर : प्रतिनिधी
लातूर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांसाठी महिलांना मोफत शहर बस सेवा सुविधेची नोंदणी करण्यासाठी ७ ठिकाणी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे आता महिलांची चांगली सोय झाली असून जास्तीत जास्त महिला स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करु शकतील.
शहरात महिलांना मनपाच्या वतीने मोफत शहर बस सेवा सुविधा देण्यात येते.ही सुविधा देण्यासाठी महिलांना नोंदणी करणे अनिवार्य आहे.त्यासाठी नोंदणी करताना महिलांना आधार कार्डची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार असून त्यानंतर स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. आतापर्यंत शहरात केवळ दोन ठिकाणी नोंदणी केंद्र होती. गंजगोलाई बस स्टॉप व जिल्हा क्रीडा संकुल बस स्टॉप येथे नोंदणी सुरू होती.परंतु महिला प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर पासून सात ठिकाणी नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
शहर मनपा कार्यालय,मनपा इमारतीत क्षेत्रीय कार्यालय क्षेत्र ए, ठाकरे चौकात क्षेत्रीय कार्यालय बी, डालडा फॅक्टरी परिसरात क्षेत्रीय कार्यालय सी, ठाकरे चौकात क्षेत्रीय कार्यालय डी, गंजगोलाईतील बस थांबा,क्रीडा संकुल शहर बस थांबा, औसा रोड असे एकूण ७ ठिकाणी नोंदणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लातूर शहर मनपा हद्दीतील महिलांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत या केंद्रावर देऊन तेथे स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही, असे आवाहन लातूर शहर मनपा परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.