सोलापूर : पीडितेचा विनयभंग करून तिच्या पती व भावास मारहाण केल्याप्रकरणी हणमंत राजू सुरगाळी, वय २६, विठ्ठल लायप्पा कटकटे, वय २१ ,गुंडराज भीमराव कटकटे, वय २२ तिघे रा – म्हैसलगी, ता. अक्कलकोट यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्यासमोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, यातील पीडिता व तिचा पती तडवळ, ता-अक्कलकोट येथे राहण्यास होते, दि ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आरोपीनी तिच्या हाताला धरून दमदाटी केली होती. तद्नंतर दि २२ जानेवारी २०२२ रोजी पीडिता हि तडवळ येथे आठवडा बाजाराकरिता गेली असता, त्यावेळेस हणमंत सुरगाळी हा तिच्या मागे पाठलाग करीत होता, त्यानंतर पीडितेने तिच्या पतीस व भावास बाजारामध्ये बोलावून घेतले, ते घरी जाण्यासाठी निघाले असता तिन्ही आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्याने मारहाण केली होती, अशा आशयाची फिर्याद पीडितेने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.
सदर खटल्यात सरकारतर्फे एकदंर ९ साक्षीदार तपासण्यात आले.खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील अॅड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात आरोपींनी गुन्हा करण्याचा कोणताही हेतू अथवा जातीबद्दलचे ज्ञान हे सरकारी पक्षाने शाबीत केले नाही त्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात यावी असा युक्तीवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.यात आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. सतीश शेटे यांनी तर सरकारतर्फे अॅड. ए. जी. कुर्डुकर यांनी काम पाहिले.