लातूर : प्रतिनिधी
महेश नवमी निमित्त लातूरात माहेश्वरी समाजाच्या वतीने आज दि. १५ जून रोजी दुपारी ४ वाजता ईश्वर बाहेती व संतोष तोष्णीवाल यांच्या नेतृत्वात अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा मार्केट यार्ड परिसरातील गौरीशंकर मंदिर ते बालाजी मंदीर अशी असणार आहे. या शोभायात्रेचा मार्ग हा गौरीशंकर मंदीर मार्केट यार्ड, गुळ मार्केट हनुमान चौक, गंजगोलाई, सुभाष चौक, खडक हनुमान पापविनाश रोड ते बालाजी मंदीर असा असणार असून बालाजी मंदीर येथे शोभा यात्राची सांगता होणार आहे. या शोभायात्रेत माहेश्वरी ढोलताशा पथक, सुमन संस्कार प्रेप स्कुलद्वारे झंकिया सादर करण्यात येणार आहे. याशिवाय या शोभायात्रेत केरळ येथील पथक, केरळची संस्कृतीचे मेल्लम, थिय्यम असे सादरीकरण करणार आहे. याशिवाय राजस्थानी पथकदेखील राहणार आहे.
याबरोबरच २० फुटी महाबली हनुमान हे या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. याशिवाय शिवतांडव, वारकरी सांप्रदायचा ग्रुपचेदेखील सादरीकरण केले जाणार आहे. शोभा यात्रेचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष लालितभाई शहा, व लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगा आरतीने होणार आहे. शोभायात्रेनंतर भगवान महेश आरती होऊन तिकीट धारकांतून महेशनावनिमित्त लक्की-ड्रॉ काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भोजन व रक्त्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.