लातूर : प्रतिनिधी
मांजरा पट्टा भागात ऊसतोड मजुरांचे स्थलांतर झाले असून, मतदानानंतर ऊस तोडणीची लगबग वाढली असल्याचे बोरगाव काळे, भिसे वाघोली, शिराळा आदी परिसरांत दिसून येत आहे. मांजरा पट्ट्यात उसाचे क्षेत्र अधिक आहे. या भागातील ऊस कारखान्यांना गाळप करण्यासाठी दिला जातो. गतवर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने उसाच्या क्षेत्रात घट झाली. त्यामुळे यावर्षीचा कारखान्यांचा गळीत हंगाम १२० ते १५० दिवसांचा राहील, अशी शक्यता आहे.
यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प, नदी भरून वाहू लागल्याने शेती सिंंचनासाठी मुबलक पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करीत आहेत. या भागातील कारखाने सुरू झाल्याने इतर जिल्ह्यांतून ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबासह मांजरा पट्टयात दाखल झाले आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतक-यांच्या उसाला प्रथम प्राधान्य देण्याच्या उद्देशाने ऊस तोडणीच्या कामास सुरुवात झाली आहे.