विलासनगर : प्रतिनिधी
राज्यातील सहकारी साखर उद्योगांमध्ये दीपस्तंभ असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ यशस्वीपणे झाला असुन, मांजरा परिवाराचे प्रमुख तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी या हंगामात कारखान्याकडे गाळपास येणा-या ऊसासाठी किमान ३ हजार रुपये प्रति मॅट्रिक टन ऊस दर देण्याचे जाहीर केला असून कारखान्याकडून या अगोदर ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांना प्रति मेट्रिक टन २७०० रुपये अदा केलेले आहेत. शेतीच्या उन्हाळी कामांसाठी शेतक-यांना मदत व्हावी यादृष्टीने, या गाळप हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रति मे. टन १०० रुपये दि. ५ मार्च रोजी ऊस बिलाचा दुसरा अंतरीम हप्ता, ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा केला आहे.
जाहीर केल्याप्रमाणे लवकरच उर्वरीत उसदर ही अदा केला जाणार आहे, अशी माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे कारखान्याने चालु गाळप गळीत हंगामामध्ये ३,२३,६०१ मे. टन उसाचे गाळप केले असून ३,१६,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याने वीज वितरण कंपनीस १,१९,२९,५४३ के डब्ल्यू एच विजेची निर्यात केली आहे.ज्युस सिरप व बी हेवीसह सरासरी साखर उतारा ११.८६६ टक्के प्राप्त झाला आहे. अर्कशाळा विभागाकडून ६२,२४,६२० लिटर आर एस व ४४,४८,७५६ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले असून अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून उसाची वाढ कमी असतानाही यावर्षी गळीत हंगाम यशस्वी झाला आहे ज्या ऊस पुरवठादारांचा गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ऊस कारखान्यास गाळपास आला आहे त्यांनी आपल्या संबधीत बँक शाखेशी संपर्क करावा व बिलाची रक्कम घ्यावी असे आवाहन कारखाना व्यवस्थापन सन्माननीय संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केले आहे.