सॅनफ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
सध्या अमेरिकेत एक भारतीय अभियंता चर्चेचा विषय बनला आहे. सोहम पारेख नावाच्या या अभियंत्याने एकाच वेळी अनेक ठिकाणी काम करून दररोज सुमारे अडीच लाख रुपये कमावल्याचा आरोप आहे. यामुळे आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या ‘मूनलाइटिंग’ या संकल्पनेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
सोहम पारेख हा मुंबई विद्यापीठातून पदवीधर आहे. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्याच्या बायोडाटानुसार, त्याने डायनामो एआय, युनियन एआय, अॅलन एआय आणि सिंथेसियासह अनेक मोठ्या टेक कंपन्यांमध्ये काम केले आहे.
मिक्सपॅनेलचे सह-संस्थापक सुहेल दोशी यांनी सर्वात आधी सोशल मीडियावर सोहम पारेखचे हे प्रकरण उघड केले. त्यानंतर ‘एआय’ गुंतवणूकदार डीडी दास यांनीही यावर भाष्य केले, ज्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आले. डीडी दास यांनी एका रेडिट वापरकर्त्याची गोष्ट शेअर केली, ज्याची ओळख नंतर सोहम पारेख म्हणून पटली. या रेडिट वापरकर्त्याने सांगितले होते की, तो एकाच वेळी ५ नोक-या करत असून वर्षाला सुमारे ६.८५ कोटी रुपये कमवत आहे.
सोहम पारेखला एक अत्यंत प्रतिभावान आणि हुशार अभियंता म्हणून ओळखले जात होते, जो इतरांना तीन तास लागणारे काम एका तासात पूर्ण करू शकत होता. मुलाखतींमध्ये तो खूप चांगला अभिनय करायचा, ज्यामुळे कंपन्या त्याला आत्मविश्वासाने कामावर ठेवत असत. पण आरोपांनुसार, सोहमने या प्रतिभेचा गैरवापर केला.