नवी दिल्ली : वृत्तसंस्था
माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता कपिल पाटील यांना गोरेगाव विधानसभा मिळण्याची शक्यता आहे.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जदयूला रामराम ठोकल्यानंतर समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली होती. मात्र, आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीत गोरेगाव किंवा वर्सोवा ही जागा काँग्रेसला सुटणार आहे. त्या जागेवर कपिल पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
संविधान वाचविण्यासाठी राहुल गांधींचा प्रदीर्घ लढा
आज आम्ही काँग्रेस पक्षात समाजवादी गणराज्य पक्ष विलीन केला असल्याचे कपिल पाटील म्हणाले. आज खरगेंच्या निवासस्थानी माझ्या गळ््यात शाल घातली आहे. फॅसिझमविरुद्ध लढायचे आहे. फॅसिझम विरोधात राहुल गांधी लढत आहेत. आम्ही बिनशर्त काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फॅसिझम विरोधात लढायचे हीच अट आहे. देशात संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधींनी प्रदीर्घ लढा दिला असल्याचे कपिल पाटील म्हणाले.