नागरिकांशी संवाद साधणार; काय निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष
अकलूज : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मारकडवाडी गावातील लोकांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर ते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशिनवर आक्षेप नोंदवला. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या वतीने ठराव करून बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षापासून या गावावर आमदार उत्तमराव जानकर यांचे वर्चस्व आहे. त्याच गावात त्यांना मतदान कमी कसे पडले, यामुळे गावकरी संभ्रमात आहेत. त्यातूनच बॅलेट पेपरवर गाव पातळीवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनाकडे परवानगीही मागितली. परंतु परवानगी मिळाली नाही. त्यानंतर मीडियाला साक्षी ठेवून मतदान घेण्याचा निर्णय घेतला. परंतु ऐनवेळी जमाबंदीचे आदेश लागू केले. त्यामुळे मतदान प्रक्रिया रद्द करावी लागली. परंतु याच मुद्यावरून आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह ८८ गावक-यावर गुन्हा नोंद केला. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी मरकरडवाडीतून लॉंग मार्च काढणार असल्याचे आ. उत्तमराव जानकर यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात ईव्हीएमचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे यांनी मारकरवाडीला भेट दिली. गावातील लोकांशी चर्चा केली. मी ८३ वर्षांचा आहे. मला कोणतीही निवडणूक लढायची नाही. परंतु देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जो उठाव केला, त्यांना सॅल्यूट घालण्यासाठी मी येथे आलो आहे. गावक-यांचा आवाज दाबण्याचा कोण प्रयत्न करीत असेल तर आम्ही हायकोर्टापर्यंत हा लढा नेल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले.
राजीनामा देण्यास तयार
माळशिरस तालुक्याचे नूतन आमदार उत्तमराव जानकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मी राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. पराभूत आमदार राम सातपुते यांना त्यांनी आव्हान दिले आहे. निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार असेल तर मी लगेच राजीनामा देतो. दुस-या दिवशी मतदान घ्या, अशी भूमिका घेतली आहे.