भूम : (गौस शेख)
तालुक्यातील माणकेश्वर येथील प्रसिद्ध सटवाईदेवी मंदिरातील प्राचीन मूर्तीबाबत पुरातत्व विभागाने सादर केलेल्या अधिकृत अहवालातून एक महत्त्वाची व संवेदनशील बाब समोर आली आहे. मूर्तीवरील जुन्या शेंदुराचे थर रासायनिक पद्धतीने काढल्यानंतर करण्यात आलेल्या मूर्तिशास्त्रीय (आयकॉनोग्राफिक) अभ्यासात ही मूर्ती मूळत: सरस्वती देवीची असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. मात्र या निष्कषार्मुळे माणकेश्वर व परिसरातील ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, नाराजीचा सूरही उमटत आहे.
अहवाल काय सांगतो?
पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक विभागीय कार्यालयाने (छत्रपती संभाजीनगर) नऊ जुलै २०२६ रोजी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालकांना (मुंबई) अहवाल सादर केला. माणकेश्वर मंदिर परिसरातील सटवाई देवीच्या मूर्तीवरील (मूर्तिशास्त्राप्रमाणे) शेंदूर काढण्यासाठी रासायनिक जतन-संवर्धनाचे काम एप्रिल-मे २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात आल्याचे या पत्रात नमूद आहे.
अहवालानुसार, माणकेश्वर येथील महादेव मंदिर हे शिलाहार-यादव कालखंडातील (साधारण १२-१३ वे शतक) असून खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराशी याचे वास्तुशैलीत साम्य आहे. या मुख्य शिवमंदिराच्या परिसरातच अलीकडील काळात बांधलेले सटवाई देवीचे मंदिर आहे. स्थानिक परंपरेत सटवाई ही सती आई किंवा षष्ठी म्हणून ओळखली जाणारी, प्रसूती, प्रजननक्षमता व मुलांच्या कल्याणाशी संबंधित रक्षक मातृदेवता मानली जाते.
मूर्तीशास्त्रीय निरीक्षणे आणि पुनर्निर्मिती
शेंदूर काढल्यानंतर मूर्तीची उंची ३.६ फूट (११० सेमी) आणि रुंदी २.३ फूट (७० सेमी) असल्याचे मोजमाप घेण्यात आले. मूर्ती आसनस्थ व चतुर्भुज असून डोक्यावर किरीट मुकुट आहे. अहवालात नमूद आहे की, मूर्तीचे मागील व पुढील दोन्ही हात, तसेच पायाची काही बोटे शेंदुराच्या जाड थराखाली आणि झिजेमुळे भग्न (तुटलेल्या) अवस्थेत आढळली. ही आयुधे व अवयव मूळ स्वरूपात कशी असावीत, हे ठरवण्यासाठी पुरातत्व विभागाने माणकेश्वर मंदिराच्याच बा भिंतीवरील (कुंभा भागावरील) यादवकालीन शिल्पांचा संदर्भ घेतला. त्या भिंतीवरील एकूण सहा मूर्ती सरस्वतीच्या असल्याचे आढळले असून, त्यापैकी एका मूर्तीशी सटवाई मंदिरातील मूर्तीची शारीरिक ठेवण
(बॉडी पोश्चर) जुळत असल्याचे अहवालात म्हटले आहे. याच एका संदर्भ-मूर्तीच्या आधारे सटवाई मंदिरातील मूर्तीचे भग्न हात, आयुधे व पायाची बोटे यांची पुनर्निर्मिती (रिकन्स्ट्रक्शन) करण्यात आले, असे अहवालाता स्पष्टपणे नमूद आहे.
प्रत्यक्ष मूर्तीवर वीणा-पुस्तक-कमळ स्पष्ट दिसत नसल्याने प्रश्नचिन्ह
अहवालातील याच भागांवरून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे सरस्वती देवीची ३१ं्िर३्रङ्मल्लंल ओळख पटवणारी वीणा, पुस्तक/वही, कमळ किंवा हंस ही चिन्हे प्रत्यक्ष सटवाई मंदिरातील मूळ मूर्तीवर स्पष्टपणे व सुस्थितीत दिसत नाहीत. अहवालानुसार मूर्तीचे हातच भग्न असल्याने, तिच्या हातातील आयुधे मुळात कोणती होती हे मूर्तीवरून स्वतंत्रपणे सिद्ध होत नाही. ते शेजारील भिंतीवरील वेगळ्या मूर्तीच्या आधारे गृहीत धरून पुनर्निर्मित करण्यात आले आहेत. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या मूळ मूर्तीवरून सरस्वती सिद्ध होते असे नसून, जवळपासच्या तत्कालीन शिल्पांशी शारीरिक ठेवणीचे साम्य आढळल्याने असा अंदाज बांधण्यात आला, असे म्हणणे अधिक वस्तुनिष्ठ ठरते. अहवालात ही बाब संदर्भाच्या आधारेच पुनर्निर्मिती असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे मूर्तीची निश्चित मूळ ओळख ही गृहितकावर आधारित असल्याचे स्पष्ट होते.
अहवालाचा अंतिम निष्कर्ष
अहवालाच्या निष्कर्षात पुरातत्व विभागाने नमूद केले आहे की, स्थानिक धार्मिक परंपरेनुसार या मूर्तीचे पूजन महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील भाविकांच्या श्रद्धेनुसार, पुजाअर्चनेनुसार तसेच रूढ धार्मिक चालीरीतीनुसार सटवाई देवी म्हणूनच केले जात असल्याचे दिसून येते. तसेच, मूर्ती सरस्वती म्हणून उजेडात आली असली तरी, त्यामागे लोकांच्या, भाविकांच्या भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश नाही.
ग्रामस्थांमध्ये संभ्रम व नाराजी, पूजा, परंपरा पूर्वीप्रमाणेच-
दरम्यान, हा अहवाल समोर आल्यानंतर माणकेश्वर व परिसरातील गावक-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. पिढ्यानपिढ्या सटवाई देवी म्हणून पूजल्या जाणा-या मूर्तीबाबत, प्रत्यक्ष मूर्तीवर सरस्वतीची ठोस ओळखचिन्हे (वीणा, पुस्तक, कमळ) दिसत नसतानाही तिला सरस्वतीच्या मूर्तिशास्त्राशी जोडणारा अहवाल आल्याने, स्थानिक श्रद्धा व अंदाजावर आधारित पुनर्निर्मिती यांच्यातील या तफावतीमुळे भाविकांमध्ये संमिश्र व नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शेंदूर काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवातीपासूनच मंदिर संस्थान व काही भाविकांनी विरोध दर्शवला होता, हे याआधीही समोर आले होते. तूर्तास पुरातत्व विभागाचा हा अहवाल तांत्रिक व मूर्तिशास्त्रीय अभ्यासाचा भाग असून, मंदिरातील पूजा-परंपरेत कोणताही बदल करण्याचा हेतू नसल्याचे अहवालातूनच स्पष्ट होते. या विषयावर संबंधित शासकीय विभाग, मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्यात पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गावकरी, भक्त काय निर्णय घेतात पाहू-
याविषयी सरपंच विशाल अंधारे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले, की पुरातत्त्व विभागाचा अहवाल तर महसूल विभागाला मिळाला आहे. मात्र महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे सटवाई मंदिर आणि गावकरी व भक्त यासंदर्भात काय निर्णय घेतील, ते आगामी काळात दिसणार आहे.
















