जळगाव : प्रतिनिधी
महायुतीचे व त्यातही भाजपचे वर्चस्व असणा-या उत्तर महाराष्ट्रात यंदा महाविकास आघाडी आणि त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्वेषाने निवडणुकीला सामोरे जात आहेत, परंतु बहुसंख्य ठिकाणी झालेली मातब्बरांची बंडाळी पाहता अनपेक्षितपणे कोणाची गणिते बिघडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरून गेले आहे.
विभागात भाजप सर्वाधिक २१ तर काँग्रेस १५ जागांवर लढत आहे, परंतु या दोन्ही प्रमुख पक्षांत थेट सामना अवघ्या सात जागांवरच होत आहे. एकेकाळी काँग्रेसचा असलेला वरचष्मा बाजूस करीत अन्य राजकीय प्रवाहांनाही संधी देऊन पाहणारा हा विभाग आहे. शेतीसंबंधित कापूस, केळी, द्राक्ष, कांदा, उसाचे व दुधाचे प्रश्न येथे आहेत तसे थबकलेल्या औद्योगिकीकरणाचेही विषय आहेत. पण, निवडणूक ‘एक है तो सेफ है’ आणि फतव्यांवर आधारित ठरली आहे.
छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावीत, गुलाबराव पाटील, जयकुमार रावल, दादा भुसे आदी ज्येष्ठ नेते पुन्हा रिंगणात आहेतच; शिवाय मातब्बर राजकीय घराण्यांची पुढची पिढी रिंगणात आहे. त्यामुळे पक्ष बदलले गेले असले तरी आपापले गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात काही जागांवर ‘माधव’ फॅक्टर पुन्हा चर्चेत आला आहे तर जरांगे फॅक्टरच्या उपयोगाचा व मतविभाजनातून लाभाचा विश्वास काही जणांना आहे. अर्थात गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा भाजपला व उर्वरित सहा जागा महाविकास आघाडीला मिळाल्याने सद्यस्थितीत विधानसभेत असलेले विभागातील ‘महायुती’चे प्राबल्य राखले जाणार का? याची उत्सुकता आहे.
राजकीय पक्ष एकूण जागा
भाजप २१
शिंदेसेना १३
अजित पवार गट १४
काँग्रेस १५
उद्धवसेना १३
शरद पवार गट १७
सहयोगी पक्ष ०२