देशातून पावसाचा हंगाम संपुष्टात येण्याची चाहूल लागली असतानाच वातावरणात अचानक मोठा बदल दिसून येत आहे. नैऋत्य मोसमी वा-यांनी पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. पंजाब, हरियाणा, सौराष्ट्र-कच्छ भागातून मान्सून वेगाने परतण्यासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. साधारणपणे परतीचा हा प्रवास १७ सप्टेंबरपासून सुरू होत असतो मात्र यंदा २ दिवस उशिराने म्हणजे १९ सप्टेंबर रोजी मान्सूनने पहिली माघार घेतली. उत्तर भारतातून पाऊस काढता पाय घेत असतानाच महाराष्ट्रावर पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटून आले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण होणा-या नव्या हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात दमदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि त्याच्या लगतच्या भागावर वा-यांची एक तीव्र चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे.
या प्रणालीचे रुपांतर लवकरच एका कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होणार आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत पुढील ३ ते ४ दिवसांत दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या पट्ट्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचले जाणार असून २० ते २५ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर पावसाची तीव्रता लक्षणीयरित्या वाढेल. हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानुसार २३ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० कि. मी. वेगाने वाहणा-या वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांमधील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार सरींची नोंद होईल. २१ सप्टेंबर रोजी नाशिक आणि लगतच्या पट्ट्यात पावसाचा चांगला प्रभाव दिसून येईल तर अहिल्यानगर जिल्ह्यातही रिमझिम ते मध्यम पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा थेट फायदा या भागाला मिळणार असून २२ सप्टेंबर रोजी मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या संपूर्ण आठवड्यात राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची चांगली उपस्थिती पहावयास मिळेल. पावसाळ्याच्या या अखेरच्या टप्प्यातील पुनरागमनामुळे कोरड्या पडत चाललेल्या शेती पिकांना संजीवनी मिळणार असून बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात गत काही दिवसापासून पावसाने पाठ फिरवली होती. राज्यात सध्या उन्हाचा चटका वाढत असतानाच वादळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील ७२ तासात मुसळधार पाऊस कोसळणार असून भारतीय हवामान विभागाने २२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. आता पावसाने पुन्हा जोर पकडण्याची शक्यता आहे.
कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात गत काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून अनेक भागात पावसाअभावी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पिके करपली गेल्याने शेतक-यांसमोर मोठे संकट उभे आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. राज्यातील काही ठिकाणी कमी वेळेत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची दांडी अशी परिस्थिती होती. शेतीसोबतच पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात वाढ होण्यास आणि शेतीला दिलासा मिळण्यास मदत होऊ शकते.
















