27.9 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeसोलापूरमारकडवाडीची पुनरावृत्ती केल्यास होणार कारवाई : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

मारकडवाडीची पुनरावृत्ती केल्यास होणार कारवाई : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर ईव्हीएमच्या हातात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना स्थान दिले आहे. तुम्हाला जर ईव्हीएमच्या बाबतीत आक्षेप असतील तर त्या त्यावेळी तुम्ही आक्षेप का घेतले नाहीत? निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बैलेट पेपरवर मतदान घेऊन तुम्हाला नक्की काय साध्य करायचे आहे, असे प्रश्न जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित केले आहेत. मारकडवाडीची (ता. माळशिरस) पुनरावृत्ती जिल्ह्यातील कोणत्या गावांनी केली तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मारकहवाडी (ता. माळशिरस) गावातून भाजपला जास्तीचे मतदान झाल्याने या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर मारकडवाडीच्या गावाचे समर्थन महाविकास आघाडी व इतरांकडून होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, मारकडवाडीच्या घटनेनंतर आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत दक्ष झालो आहोत. सर्व अधिकाऱ्यांना या संदर्भातील सूबना दिल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएमची फर्स्ट लेव्हल चेकिंग, मॉकपोल, प्रत्यक्ष मतदान, मतदान झाल्यानंतर स्ट्रॉगरूममध्ये ईव्हीएम ठेवणे व काढणे, स्ट्रॉगरुमची सुरक्षा सुरक्षेदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज, मतमोजणी यासह ईव्हीएमच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आलेले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडत असताना आलेल्या तक्रारीची आक्षेपांची आम्ही दखल घेतो. निकाल जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीने तक्रार करणे, अशा पद्धतीचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.

जिल्ह्यात वापरलेल्या ईव्हीएमपैकी पाच टक्के ईव्हीएमचे मॉकपोल झाले आहे. या पाच टक्क्यांमधील मशिन कोणत्या असाव्यात, हे निवडण्याचा अधिकार राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना होता, तरी देखील अशा पद्धतीचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. मारकडवाडी गावात संचारबंदी लावण्यात आली होती. या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारकडवाडीप्रमाणे अन्य गावांत अशा पद्धतीने प्रयत्न होऊ नयेत, यासाठी आम्ही दक्ष आहोत. ज्या गावांमधून अशा पद्धतीचा प्रयत्न होईल, त्यांच्यावर यापेक्षाही कठोर कारवाई केली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR