24.5 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रमारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंद

मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंद

छावा कार्यकर्ते आक्रमक, राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या छावाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवार, दि. २१ जुलै रोजी लातूर बंदची हाक दिली आहे. शेतक-यांच्या मुलांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा निषेध म्हणून लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. हा सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला असून, या बंदमध्ये अठरा पगड जाती सहभागी होऊन घटनेचा निषेध करतील, असे कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अभयदादा साळुंके यांनी सांगितले. त्यानंतर दुस-या दिवशी सर्व तालुक्यांत बंद पाळला जाईल. यातूनही मारेक-यांवर कारवाई न केल्यास याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील, असेही साळुंके म्हणाले. दरम्यान, छावाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, रात्री उशिरा औसा रोडवरील राष्ट्रवादीचे बॅनर फाडले. या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, या मारहाणीत जखमी झालेल्या छावाच्या विजयकुमार घाटगे यांना रात्री येथील अपोलो या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घाटगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर कॉंग्रेसचे अभयदादा साळुंके, छावाचे नानासाहेब जावळे यांनी घाटगे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन चर्चा केली. या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी लातूर बंद पुकारला आहे. या सर्वपक्षीय बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अभयदादा साळुंके यांनी सांगितले. तसेच कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांनी शेतक-यांच्या मुलांवर झालेला भ्याड हल्ला असून, या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही सहभागी होणार आहोत, असे म्हटले.

छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर छावाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला जात आहे. त्यातच संतप्त छावा कार्यकर्त्यांनी औसा रोडवरील राष्ट्रवादीचे बॅनर फाडून निषेध नोंदविला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना वेळीच रोखल्याने अनुचित प्रकार टळला. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

घाटगे रुग्णालयात
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे जखमी झाले असून, त्यांच्या पाठीत, छातीत, पोटात बुक्क्या घातल्याने रात्री त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना अपोलो या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची रात्री उशिरापर्यंत सर्व तपासण्या करून उपचार सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आपण सर्वांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवू, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR