मुंबई : प्रतिनिधी
राज्यात होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे . फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई व कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. राज्यात सध्या प्रचंड उष्ण तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत . ९ ते ११ मार्चपर्यंत कोकणपट्ट्यासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान राज्यभरात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा तापला आहे. बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० अंशापर्यंतची नोंद होत आहे. मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे.
पुढील काही दिवस इशान्येकडील वारे सक्रिय झाल्याने उत्तरेकडून येणा-या शहरात पूर्वेकडील वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ होत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्यात पुढील २४ तासांत कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात आज किमान तापमानातही वाढ झाल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.
फेब्रुवारी आजपर्यंतचा सर्वांत उष्ण महिना
दरम्यान, राज्यात उन्हाचा चटका वाढला असून नुकताच संपलेला फेब्रुवारीचा पूर्ण महिना सरासरीपेक्षा खूप उष्ण ठरला. देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान २७.५८ अंश सेल्सिअस असते, मात्र यंदा ते २९.७ अंश सेल्सिअस राहिले आहे. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुस-या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. २०२३ च्या फेब्रुवारीत २९.४४ अंश सेल्सिअस नोंद झाली होती.