चंद्रपूर : प्रतिनिधी
विदर्भातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची ख्याती आहे. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्याची सुरवातच तीव्र स्वरूपात झाल्याचा अनुभव चंद्रपूरकरांना येऊ लागला आहे. मार्च महिना सुरु झाला असतात महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच चंद्रपुरातील तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. यामुळे आतापासूनच रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत.
तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर शहरात उन्हाचे चटके आतापासूनच जाणवू लागले आहेत. मार्च महिना सुरू झाला असतानाच तापमान ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिना कसा असेल याचा अंदाज येऊ शकतो. सिमेंट रस्ते, कोळसाखाणी, वीज प्रकल्प, कोळशाचा घरगुती आणि औद्योगिक वापर, वातानुकूलित यंत्रे या सर्वांचा एकत्रित परिणाम तापमानवाढीवर होत असल्याचे बोलले जात आहे.
तापमान ४६ अंशापर्यंत जाण्याची शक्यता
चंद्रपूरमध्ये सद्यस्थितीत तापमान ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. आता केवळ ४० अंशाच्या जवळपास तापमान असतानाही उन्हाचे चटके बसत असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे बघायला मिळत आहे. तर एप्रिल आणि मे महिन्यात शहर आणि जिल्ह्याचे तापमान ४६ अंशावर जात असते. त्यामुळे नागरिक होरपळून निघतात. त्यानुसार यंदा देखील पारा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रुग्णालयात कुलर झाले सुरू
विदर्भातील सर्वात उष्ण शहर असलेल्या चंद्रपूरमध्ये सध्या तापमान वाढले असल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. त्यामुळे पुढचे दिवस कसे असतील हा विचारच घाम फोडणारा आहे. सामान्य रुग्णालयात आतापासून कूलर सुरू झाले असून, रस्त्यावर पाण्याचा फवारा मारला जात आहे. तापमानासोबतच प्रदूषणही मोठे असल्याने येथील नागरिकांना दुहेरी समस्येला सामोरे जावे लागत आहे.