मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याची सुनावणी १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शनिवारी पूर्ण झाली. त्यानंतर विशेष न्यायालयाने खटल्याचा निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता ८ मेपर्यंत स्थगित केली. त्यामुळे विशेष न्यायालय आता ८ मे रोजी खटल्याचा निकाल देण्याची शक्यता आहे.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर खटला चालविण्यात आला. खटल्यात सरकारी वकिलांनी ३२३ साक्षीदारांची साक्ष नोंदविली असून, त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले. शिवाय गेल्या १७ वर्षांत अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी हे खटल्याचे कामकाज पाहणारे पाचवे न्यायाधीश ठरले. एनआयए कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी विशेष सरकारी वकिलांनी विविध निवाड्यांचा दाखला देणारी लेखी स्वरुपातील अंतिम युक्तिवाद न्यायालयात सादर केला. त्यानंतर विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्याचे आणि निकाल राखून ठेवला असल्याचे जाहीर केले.