पुणे : प्रतिनिधी
शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात शिवसैनिकांचा संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला.
यावेळी त्यांचे नाव न घेता त्यांना ढेकणाची उपमा दिली. त्यामुळे पुन्हा भाजप आणि शिवसेना उबाठामधील वाद रंगणार आहे. यावेळी पुणे शहराचा विकास करताना नदीचा प्रवाह भाजप बंद करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तू राहूच शकत नाही, तुझा बंदोबस्त करण्यासाठी मी मैदानात उतरलो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
ब-याच वर्षांनंतर मी पुण्यात तुमच्यासमोर येतोय. आज मला जाहीर सभा घ्यायची होती. आता लढाई मैदानात होणार आहे. हॉलमध्ये होणार नाही. मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. त्यानंतर माझ्या पायाशी कलिंगड ठेवले गेले. काही जणांना वाटले मी त्यांना आव्हान दिले. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटाने चिरडले जाते. त्यानंतर ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस.
नद्यांचे प्रवाह बंद केले जात आहेत
पुण्यात मुळा-मुठा नदी आहे. त्याबाबत व्यंकय्या नायडू म्हणाले होते, मुळा-मुठा हे काय नाव आहे. व्यंकय्या नाव ठेवायचे का, की मोदी नदी म्हणायचे का?. त्यांनी नद्यांची नावे बदलायला सांगितली. नावे तर बदलू शकत नाही. पण त्यांनी प्रवाह बदलला. पुण्यात नाईक बेट आहे. या नाईक बेटाचा दोन्ही बाजूंनी प्रवाह बंद केला.