मुंबई : विशेष प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘झिरोदा’चे सहसंस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये अनेक मुद्यांवर मनमोकळे मत व्यक्त केले. राजकारणात चांगले लोकं आली पाहिजेत, यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला. नव्या लोकांनी राजकारणात महत्त्वाकांक्षा नाही तर मिशनसह आलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर मी मनुष्य आहे, देव नाही, माझ्याकडूनही चुका होतात अशा मनातल्या गोष्टी पंतप्रधान मोदी यावेळी सांगितल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. मला माहिती नाही की हा तुमच्या प्रेक्षकांना कसा वाटेल. वाईट हेतूने कोणतेही चुकीचे काम करु नका हा माझा जीवनाचा मंत्र आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री झाल्यावर एक भाषण केले होते. त्यामध्ये मी कठोर परिश्रमापासून मागे हटणार नाही. स्वत:साठी काही करणार नाही, असे सांगितले होते. मी माणूस आहे. चुका करु शकतो, पण, कधीही वाईट वृत्तीनं काही चूक करणार नाही. हा माझा आयुष्याचा मंत्र आहे. शेवटी मी कुणी देव नाही.
निखिल कामतने यावेळी पंतप्रधानांना जगभरात सुरु असलेल्या युद्धावरही प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान म्हणाले की, या संकटाच्या काळात आम्ही तटस्थ नाही, हे मी सतत सांगितले आहे. मी सतत सांगतोय की, मी शांततेच्या बाजूने आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.