मुंबई : प्रतिनिधी
माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. मुंडे यांना अर्धांगवायू झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, त्यांना हा आजार झालाच नसल्याचे आता खुद्द धनंजय मुंडे यांनीच स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांना जडलेल्या आजाराची यात माहिती दिली आहे.
आमचे सहकारी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला ‘बेल्स पाल्सी’ हा आजार दीड महिन्यापूर्वी झाला असून त्याचा परिणाम चेह-यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र, मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून ‘बेल्स पाल्सी’ आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होत असून, बोलायला त्रास आहे. मात्र, नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही.