32.2 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई विमानतळावर  ८ कोटींचे सोने जप्त

मुंबई विमानतळावर  ८ कोटींचे सोने जप्त

मुंबईत सोने तस्करीचा पर्दाफाश
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या सक्त वसुली संचालनालयाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश केला. या सोने तस्करीत विमानतळावरील कर्मचा-याचा हात असल्याचे निदर्शनास आले. सक्त वसुली संचालनालयाने ४ स्वतंत्र गुन्हे दाखल करत १० किलो ९२३ ग्रॅम सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ही ८ कोटी ४७ लाख असल्याची माहिती सक्त वसुली संचालनालयाने दिली.
पहिल्या गुन्ह्यात कॅप्सुल पद्धतीने सोन्याची पावडर विमानतळावरील कर्मचा-यांद्वारे लपवून नेली जात असताना रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळून २ किलो ८०० ग्रॅम सोन्याची पावडर जप्त केली असून त्याची किंमत २ कोटी २७ लाख ८९ हजार ३७० इतकी आहे तर दुस-या गुन्ह्यात विमानतळावरील कर्मचा-यांच्या संशयास्पद हालचालीवरून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळही २ किलो ९०० ग्रॅम सोन्याची पावडर असलेले कॅप्सुल आढळून आले, ज्याची किंमत २ कोटी ३६ लाख ३ हजार १७४ इतकी आहे. तिस-या गुन्ह्यात ही विमानतळावरील खासगी कर्मचा-याजवळ २ कॅप्सुल आढळून आल्या असून यात ६१० ग्रॅम सोन्याची पावडर होती, ज्याची किंमत १ कोटी ३१ लाख आहे. अंतरवस्त्रात हे सोनो लपवून नेले जात होते. चौथ्या गुन्ह्यात विमानतळावरील कर्मचा-याच्या बॅगमध्ये दोन पाऊचमध्ये अशाच पद्धतीने सोन्याच्या पावडर आढळून आली आहे. अंदाजे ३ किलो १२० ग्रॅम ही सोन्याची पावडर असून त्याची किंमत २ कोटी ५३ लाख इतकी आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून अधिक तपास सुरू आहे.
सोने तस्करीच्या घटनांमध्ये वाढ
सोन्याच्या आयात शुल्कातील वाढ आणि भारतात सोन्याच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सोने तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. केवळ सोन्याचे दागिने, बिस्किटे, बारच नव्हे तर सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनही सोन्याची तस्करी होत आहे. विशेष म्हणजे, सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर यावर प्रक्रिया करत त्यातून सोने घडवत त्यांची विक्री भारतामध्ये होत आहे. अशा घटनांवर विविध विभाग लक्ष ठेऊन आहेत. गेल्या काही दिवसात देशात दुबई, आबुधाबी, बँकॉक, मस्कत, सिंगापूर येथून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, दिल्ली या विमानतळावर तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्यामुळे अनेक तस्करांनी परदेशातून भारतीय छोट्या विमानतळांकडे जाणा-या विमानातून सोने तस्करी करण्याचा देखील प्रयत्न अलीकडे सुरू केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR