१० कोटींचे ड्रग्ज जप्त, प्लास्टिकच्या झाडूमधून केली जात होती तस्करी
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील दादर येथे प्लास्टिकच्या झाडूमधून तब्बल १० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा पोलिसांनी भांडाफोड केला. याचा व्हीडीओही व्हायरल झाला असून, ड्रग्ज तस्कर प्लास्टिकच्या झाडूमध्ये ड्रग्जची तस्करी करत असल्याचे दिसत आहे.
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट ९ ने दादर स्थानकाजवळील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून कारवाई केली. तसेच या गेस्ट हाऊसवरून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून तब्बल ५ किलो ४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही १० कोटी ८ लाख रुपये आहे तर जहांगीर शेख आणि सेनुअल शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता बळावली आहे.
दुसरीकडे तपासादरम्यान जहांगीर नावाच्या आरोपीने अनेक प्लास्टिकच्या झाडूंचा वापर करून अमली पदार्थ एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेल्याचे उघड झाले आहे. यानंतर आरोपी जहांगीरने दुस-या आरोपी सेन्युअलच्या घरी हे ड्रग्ज भरलेले झाडू लपवून ठेवले होते. पोलिसांच्या पथकाने तेथे पोहोचून पंचनामा करून प्लास्टिक झाडू जप्त केला. सध्या पोलिसांचे पथक त्यांना ड्रग्ज पुरवणा-या व्यक्तीच्या मागावर आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात एनडीपीएसच्या कलम ८ (सी) आर/डब्ल्यू २२ (सी), २९ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.