22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स!

मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स!

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आपलाच उमेदवार निवडून यावा म्हणून जो-तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. त्याला त्याचे वरिष्ठ नेतेही साथ देत आहेत. परंतु ही वरिष्ठ मंडळी उमेदवाराच्या प्रचार सभेत भाषण करताना हळूच आपल्या मनोरथाचे पिल्लू सोडून देतात ते अनेकांच्या लक्षातच येत नाही. या नेत्यांच्या ओठात एक अन् पोटात दुसरेच असते. मतदान होईपर्यंत आपल्या मित्रपक्षांना दुखवायचे नाही अशी त्यांची रणनीती असते, परंतु निवडणूक निकालानंतर काय होणार आहे याचीही झलक ते देत असतात. भावी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, महायुतीचा उमेदवार कोण ते निवडणुकीनंतर जाहीर करू.

सध्या महायुतीचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या नेतृत्वाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे सरकार पूर्ण बहुमताने राज्यात विराजमान होणार असून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर जाहीर करू असे अमित शहा यांनी म्हटले आहे. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या प्रकाशनानंतर अमित शहा म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकणार आहे. निवडणुकीनंतर तीन पक्षांच्या सदस्यांची समिती बनवली जाईल. समिती जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीबाबत प्राधान्यक्रम ठरवेल. सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. निवडणुकीनंतर महायुतीतील घटक पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचा निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाला व शरद पवार यांनी अजित पवार यांच्या ऐवजी आपल्या मुलीला प्राधान्य दिल्याने शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फुटले.

हे दोन्ही पक्ष केवळ आपल्या कुटुंबाचेच भले करत असल्याने त्या पक्षात फूट पडली. या फुटीचे खापर मात्र भाजपवर फोडले जात आहे. भाजपचे राजकारण हे घराणेशाहीच्या विरोधात आहे असे सांगून अमित शहा म्हणाले, शरद पवार जी आश्वासने देतात, मुद्दे उपस्थित करतात त्याचा वास्तवाशी काडीमात्र संबंध नसतो. ते नेहमी खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात, नकली जनादेश घेण्याचे काम करत असतात. मात्र यावेळी ते शक्य होणार नाही. कारण महाराष्ट्रातील जनतेला सर्व गोष्टी माहीत आहेत. या वेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत असणार असे शहा यांनी ठामपणे सांगितले. खरे पाहता वास्तव काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत आहे. २०२९ ची निवडणूक भाजप स्वबळावर लढेल आणि मुख्यमंत्री भाजपचाच राहील असे अमित शहा म्हणाले होते. भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहतील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते याचा विसर जनतेला पडलेला नाही.

कारण भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे जनता जाणून आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आता लपून राहिलेला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यामागे भाजपचा हात आहे हेही जनतेला माहीत आहे. भाजपचे हे उद्योग जनतेला रुचलेले नाहीत हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले, आता विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल असेच सध्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांना मोठा फटका बसला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निवडणुकीत फारसा सक्रिय झाला नाही. त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले. मिशन ४५ हाती घेणारी महायुती केवळ १७ वर थांबली. आता विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची ‘सायलेंट फोर्स’ सक्रिय झाली आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघाचे स्वयंसेवक मेहनत घेत आहेत.

निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल या चर्चेवर भाष्य करताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. ही माझ्या पक्षाची भूमिका आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपण राहू असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा मोठा तोटा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सहन करावा लागला होता. उत्तर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतक-यांनी महायुतीला रडवले होते. यावेळीही विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यामुळे शेतकरी सत्ताधा-यांवर नाराज आहेत. मोदी-शहांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे घोषित केले आहे.

अप्रत्यक्षपणे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा आहे. आता प्रश्न असा आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नसतील तर त्यांच्या गटाने भाजपला जिंकण्यासाठी मदत का करायची? लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाची मते भाजपच्या उमेदवाराला मिळाली नसल्याची तक्रार भाजपच्या नेत्यांनी केली होती. भाजप-शिंदे गट हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आहेत, पूर्वीपासून ते मित्र होते असे गृहित धरले तरी, शिंदेंचे भवितव्य अधांतरी असेल तर त्यांच्यादृष्टीने ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. कारण निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आली तर शिंदेंचा फडणवीस होऊ शकतो. म्हणजे मुख्यमंत्री भाजपचा आणि शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्री! निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊन महायुतीला दणका दिला आहे.

भारतात लोकशाही आहे. सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने जीवन जगत आहेत. असे असताना भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ हे खूळ कशासाठी आणले? देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशचे महत्त्व अधिक आहे म्हणून त्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी आणले असावे. ‘बटेंगे तो कटेंगे’चे खूळ त्यांचेच. पण महाराष्ट्रात ‘बुलडोझर’ संस्कृतीला थारा मिळणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. आता देशात हिंदूंची संख्या शंभर कोटींहून अधिक आहे तेव्हा बांगला देशात जशी परिस्थिती निर्माण झाली तशी भारतात निर्माण होणे अशक्यच. नसते खूळ उत्पन्न करण्यापेक्षा महागाईला कसा आळा घालता येईल ते पहा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR