मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून वाईट कारणांमुळे चर्चेत आहे. डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडली. लाठ्याकाठ्या आणि पाईपच्या मदतीने ही मारहाण झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. घडलेल्या प्रकाराचे फोटोही व्हायरल झाले असून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केले आहेत.
मुख्यमंत्री महोदय हे फोटो पहा आणि तुम्हाला झोप कशी लागते ते सांगा? डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे.
लाठ्याकाठ्या आणि पाईपच्या मदतीने केलेल्या या मारहाणीत महिला वकील जबर जखमी झाल्या आहेत. वकील असलेल्या महिलेला जर मारहाण होत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येते. या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे, असे ट्विट करत रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.