जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कारच्या ताफ्यात एक रॉन्ग साईडने येणारी कार घुसली. या कारच्या जोरदार धडकेने पोलिसांसह ९ जण जखमी झाले असून सुदैवाने मुख्यमंत्री भजनलाल यांना काही झालेले नाही. त्यांनी स्वत:च या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
जयपूरातील जगतपुरा एनआरआय सर्कल मुख्यमंत्री भजनलाल यांच्या गाड्यांच्या ताफा जात असताना अचानक रॉन्ग साईडने एक कार ताफ्यात घुसली आणि तिने अनेकांना धडक दिली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की रॉंन्ग साईडने येणा-या या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात सात पोलिसासह नऊ जण जखमी झाले आहेत. या कारमधील दोन जण जखमी झाले आहेत.
या अपघातानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी संबंधित कारला ताब्यात घेतले आहे. या कारचा चालक देखील जखमी झाला आहे. पोलिस आता या प्रकरणात चूक कशी झाली याचा तपास करीत आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी सीएमचा ताफा जात असताना सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून स्वतंत्र मार्गिका करण्यास मनाई केली होती. त्यामुळे सर्वसामान्य कारना थांबविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे रॉन्ग साईडने येणा-या कारने धडक मारल्याचे उघड झाले आहे.