बागपत : वृत्तसंस्था
पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ आणि त्यांच्या कुटुंबियांचा भारतातून मागमूसही पुसला गेला. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा भाऊ आणि कुटुंबीयांच्या जमिनीचा उत्तर प्रदेशातील बागपत येथील लिलाव करण्यात आला. या १३ बिघा जमिनीचा लिलाव १ कोटी ३८ लाख १६ हजार रुपयांना झाला आहे. त्याची मूळ किंमत ३९ लाख १६ हजार रुपये ठेवण्यात आली होती.
बागपतच्या कोटाणा गावात असलेली ही जमीन शत्रूची मालमत्ता होती. लिलावाचे पैसे केंद्रीय मंत्रालयाच्या कस्टोडियन ऑफ एनीमी प्रॉपर्टी डिपार्टमेंटच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. परवेज मुशर्रफ यांचे वडील आणि आई दिल्लीला जाण्यापूर्वी येथे राहत होते. उत्तर प्रदेशातील परवेझ मुशर्रफ यांच्या कुटुंबाची भारतातील ही शेवटची जमीन होती.
लिलावादरम्यान, तीन लोकांनी या मालमत्तेची किंमत १.३८ कोटी रुपये ठेवली आहे. खसरा क्रमांक आठच्या जमिनीची ई-लिलाव प्रक्रिया सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. ही मालमत्ता १० तासांत खरेदी करण्यात आली. शत्रूच्या मालमत्तेची विक्री केल्याने बागपतमध्ये परवेझ मुशर्रफ आणि त्यांच्या कुटुंबातील अस्तित्व कायमचे मिटले गेले आहे.