तुळजापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच हे गुरुवार रात्री आपल्या चार चाकी गाडीने जात होते. यावेळी अज्ञात चार व्यक्तींनी मोटरसायकल वरून येत दगड, अंडे मारले. त्यानंतर गाडीत पेट्रोल भरलेले पाकिट टाकून अज्ञात मारेकरी फरार झाले.
यापूर्वी जवळगा मेसाई येथे पवनचक्की कंपनी व शेतक-यांमध्ये वाद झाला होता. याबाबत प्रशासनाने अद्यापपर्यत कुठलीच पावले न उचलल्याने सरपंचावर हल्ला होण्याची घटना घडली. येथे कार्यरत असणा-या पवनचक्की कंपनीचे मंडळी गाड्याचा ताफा व बाँऊन्सर घेऊन येत असल्याने गावात दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच २६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनातून व्होनाळा ते जवळगा मेसाई रोडवर व्होनाळा गावाकडे जात होते. यावेळी वाटेत असताना दोन नेमप्लेट नसलेल्या मोटरसायकलवरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी मिळून सरपंचाच्या गाडीवर दोन्ही बाजूने अंडे, दगड मारून काच फोडून गाडीत सरपंच व त्यांच्या मित्राच्या अंगावर पेट्रोल भरलेले पाकिट फेकून हल्ला केला.
याप्रकारची फिर्याद नामदेव बालिश निकम (वय ३८, रा. मेसाई जवळगा) यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली. त्यानुसार ५९१/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११०, ३२४, (६), ११८ (१), १२६ (२), ३५२, ३, (५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक रविंद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, पोलीस निरिक्षक रविंद्र खांडेकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक भालेराव तसेच इतर पोलीस तातडीने दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.