22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीययंदा मेअखेर मान्सून केरळात!

यंदा मेअखेर मान्सून केरळात!

भारतीय हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : प्रतिनिधी
उन्हाच्या कडाक्यात हैराण झालेल्यांसाठी दिलासादायक बातमी असून, आता नैऋत्य मोसमी वारे यंदा काही दिवस लवकर केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या बातमीमुळे शेतक-यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून केरळात ३१ मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मागील वर्षी ४ जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून ८ जून रोजी केरळात दाखल झाला होता. यंदा १९ मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्वसामान्यपणे मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होत असतो. मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा मान्सून सामान्य तसेच सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता. मात्र, यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR