स्कायमेटचा अंदाज, जून ते सप्टेंबरदरम्यान ८६८ मि, मी, पाऊस !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील आघाडीची हवामान विषयक अंदाज करणारी संस्था स्कायमेटने यंदाचा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०३ टक्के पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये ५ टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी ८६८.६ मि. मी. पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. यंदाही चांगला पाऊस होणार असल्याने शेतक-यांसाठी ही गूड न्यूज आहे.
स्कायमेटचे जतिन सिंह यांच्या मते ला निना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करणा-या एल निनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. एल निनो दक्षिणी दोलन फार न्यू्ट्रल राहणार असल्याने भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ला निना कमकुवत असणे आणि एल निनो प्रभावी नसल्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. हिंदी महासागरातील स्थिती एल निनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुस-या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
जून महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के म्हणजे सामान्य पाऊस राहू शकतो. या महिन्यात १६५.३ मिलीमीटर पावसाची नोंद होईल. जुलै महिन्यात १०२३ टक्के पाऊस होईल तर २८०.५ मिलीमीटर पावसाची नोंद होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक १०८ टक्के पाऊस होऊ शकतो. या महिन्यात २५४.९ मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १०४ टक्के म्हणजेच १६७.९ मिलीमीटर पावसाची नोंद होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य प्रदेश, महाराष्ट्रात
पुरेसा पाऊस पडणार!
स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रत पुरेसा पाऊस होईल. पश्चिम घाटात प्रामुख्याने केरळ, कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल.