मुंबई : प्रतिनिधी
यशश्री हत्याप्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. राज्याच्या अनेक भागात आंदोलने सुरू आहेत. तर उद्या आरोपी दाऊद शेख याची कोठडी संपत असतानाच पोलिसांना एक मोठं यश आलं आहे. पोलिसांना यशश्रीचा गायब झालेला मोबाईल सापडला असून या मोबाईलमधून अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. यशश्रीचा गायब झालेला मोबाईल अखेर पोलिसांना सापडला आहे. या मोबाईलमधून यशश्रीच्या हत्येचा उलगडा होणार आहे. दाऊद शेख आणि यशश्रीचं संभाषण तसेच व्हॉट्सअॅप चॅटवरून या हत्येचा उलगडा होण्यास मदत होणार असून पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागण्याची शक्यताही या निमित्ताने वर्तवली जात आहे.
नवघर पोलिस स्टेशनच्या परिसरातच हा मोबाईल सापडला आहे. हा मोबाईल पाण्यात भिजल्याने तो दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. त्यात दाऊद शेख आणि यशश्रीचे संभाषण रेकॉर्ड असल्याचे सांगितले जात आहे. त्यातून पोलिसांच्या हाती या प्रकरणाची बरीच माहिती मिळणार आहे.
घटनेच्या दिवशी यशश्रीने कुणाकुणाला फोन केला होता, ती कोणत्या कोणत्या परिसरात गेली होती, याची माहितीही पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मोबाईलमधून आणखी काही खुलासे होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, यशश्री हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याची उद्या १३ ऑगस्ट रोजी पोलिस कोठडी संपत आहे.